नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले आहे. उद्या माझ्या अनेक बड्या नेत्यांसह मी भाजपच्या हेडक्वार्टरवर धडक देणार आहे, कोणा कोणाला तुम्हाला तुरुंगात टाकायचे आहे त्यांना टाका, असे त्यांनी जाहीर केले आहे.
केजरीवाल म्हणाले, तुम्ही पाहात आहात की मोदी आम आदमी पार्टीच्या कसे मागे पडले आहेत, ते आमच्या नेत्यांना कशा प्रकारे तुरुंगात टाकत आहेत. त्यांनी मला तुरुंगात टाकले, मनिष सिसोदिया यांना तुरुंगात टाकले, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकले. आज माझ्या पीएला देखील तुरुंगात टाकले. आता ते राघव चढ्ढा जे नुकतेच लंडनवरुन परतलेत त्यांनाही तुरुंगात टाकणार असल्याचे कळत आहे. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की, तुम्ही हा जेल-जेलचा खेळ खेळत आहात. त्यानुसार आमच्या एकेका व्यक्तीला तुरुंगात टाकत आहात. उद्या मी १२ वाजता आमच्या सर्व बड्या नेत्यांसह, आमदार-खासदारांसह भाजपच्या मुख्यालयात येणार आहे. ज्यांना तुम्हाला तुरुंगात टाकायचे आहे टाका, एकाच वेळी सर्वांना तुरुंगात टाका.
तुम्हाला वाटत आहे की, असे करुन तुम्ही आम आदमी पार्टीला चिरडून टाकाल पण अशा प्रकारे आम आदमी पार्टी संपणार नाही. एकदा तुम्ही सर्वांना तुरुंगात टाकून तर बघा. आम आदमी पार्टी हा विचार आहे जो संपूर्ण देशभरात लोकांच्या हृदयात पोहोचला आहे. जितक्या आपच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात टाकाल तितके शेकडो नेते हा देश तयार करेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
मी विचार करतोय की हे आम्हाला तुरुंगात का टाकत आहेत, आमची चूक काय आहे. आमची चूक ही आहे का की आम्ही दिल्लीतील गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय केली, त्यासाठी चांगल्या सरकारी शाळा तयार केल्या. हे बनवू शकत नाहीत, त्यामुळे आमची काम हे थांबवू पाहात आहेत. आम्ही दिल्लीत मोहल्ला क्लिनिक बनवलेत, चांगल्या मोफत उपचारांची सोय केली, ते हे करु शकत नाही. दिल्लीतील २४ तास मोफत सुरु असणारी वीज यांना बंद करायची आहे, हीच आमची चूक आहे. यासाठीच ते आम्हाला तुरुंगात टाकत आहेत, अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्रही सोडले.