नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रॉबिन उथप्पाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भविष्य निर्वाह निधी घोटाळाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पावर भविष्य निर्वाह निधी घोटाळ्याचा आरोप आहे. प्रादेशिक पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी त्याच्याविरुद्ध हे अटक वॉरंट जारी केले आहे. यासोबतच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सेंच्युरीज लाईफस्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन रॉबिन उथप्पा पाहत होता. आता रॉबिनवर कंपनीच्या कर्मचा-यांच्या पगारातून पीएफ कापून नंतर तो त्यांच्या खात्यात जमा न केल्याचा आरोप होत आहे. अहवालानुसार, हा संपूर्ण घोटाळा २३ लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.