26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्र‘रयत’च्या शाळांतून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण!

‘रयत’च्या शाळांतून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण!

शरद पवार यांची घोषणा, अहिल्यानगरच्या चिचोंडी पाटील येथील कार्यक्रमादरम्यान दिली माहिती

अहिल्यानगर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांतून कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज रविवारी चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) येथे बोलताना सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. आगामी काळात या शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. काळाची पावले ओळखून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयतच्या शाळांमधून कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या निर्णयाचे कौतुक होत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या चिचोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची नवीन इमारत देणगीदार व ग्रामस्थांच्या मदतीतून उभारण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगीरथ शिंदे होते. आमदार आशुतोष काळे, महेंद्र घरत, माजी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, डॉ. अनिल पाटील, कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते.

नव्या पिढीला ज्ञानाच्या सागरात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाच्या मदतीतून संस्थेची उभारणी केली. अनेक दानशूर या संस्थेला मदत करत आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काळजी घेतली जात आहे, असेही शरद पवार म्हणाले. आमदार आशुतोष काळे यांनी संस्थेच्या शाळांतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल, अशी सूचना केली. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगीरथ शिंदे म्हणाले, संस्थेकडे ३ हजार शिक्षकांची कमतरता भासते. त्यावर ८० ते ९० कोटी रुपये खर्च होतात. राज्य सरकारने हा खर्च करायला हवा, परंतु तो संस्थेला करावा लागत आहे. यावेळी महेंद्र घरत, आबा कोकाटे, सरपंच शरद पवार, डॉ. संजय कळमकर आदींची भाषणे झाली.

कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज
काळ, काम, वेगाचे गणित घातल्यास सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज बनली आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढू लागला आहे. यामुळे गतीशील काम होण्यास मदत मिळत आहे. तसेच अचूक कामे होण्यासही मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रयत शिक्षण संस्थेने आता आपल्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR