बीड : वेगवेगळ्या अडचणीत सापडलेल्या सामान्य लोकांनी डायल ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. त्यानंतर पोलिस अवघ्या ६.३६ मिनिटांत पोहोचल्याचे समोर आले आहे. यावरून यंत्रणा सक्षम असल्याचे दिसते. मीरा भाईंदरमध्ये अवघ्या अडीच मिनिटांत पोलिसांनी मदत केली तर मुंबई शहरात मदतीसाठी पोलिसांना तब्बल २१ मिनिटांचा वेळ लागला आहे.
२०२४ या वर्षात १७ लाख २५ हजार लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाईन सुरू झाली होती. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात याची ट्रायल घेण्यात आली होती. प्रत्येक पोलिस ठाण्यात डायल ११२ साठी स्वतंत्र यंत्रणा आहे. एका ठाण्यात किमान ५ ते २० एमडीटी मशीन (मोबाईल डेटा टर्मिनल) आणि दुचाकी, चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉल येताच हे लोक घटनास्थळी धाव घेतात.
कॉलचे लोकेशनही समजते
११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते. विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने कॉल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा लवकर मदत मिळत आहे.
फेक कॉल करणा-यांवर कारवाई
काही टवाळखोरांसह लहान मुले हे टाईमपास म्हणून ११२ वर कॉल करून खोटी माहिती देतात; परंतु पोलिस तरीही जाऊन खात्री करतात. खोटे असल्याचे समजताच गुन्हा दाखल करतात यापूर्वी बीडमध्ये एका अल्पवयीन मुलाने आजीच्या फोनवरून कॉल करून शाळेत बॉम्ब असल्याची माहिती दिल्याने यंत्रणेची धावपळ झाली होती. यात संबंधितांवर कारवाई केली होती.
नाली तुंबली, पाणीच येईना
या हेल्पलाईनवर काही लोक पोलिसांच्या संबंधित नसणा-याही तक्रारी करतात. जशा की आमच्या नळाला पाणी येईना, नाली तुंबली, घंटागाडी येईना आदींचा समावेश आहे.
बायको जेवायलाच देईना
काही दारूड्यांनी तर घरात बायको जेवायला देत नाही, मला घरी जायला वाहनच नाही, अशाही तक्रारी केल्या. बायको माहेरी गेली, आता परत येईना, अशाही तक्रारी आल्याचे सांगण्यात आले.
दुर्लक्ष करीत नाही : काँवत
डायल ११२ ही हेल्पलाईन सामान्यांसाठी खूप आधार देणारी ठरत आहे. बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस मदतीसाठी २४ तास तत्पर असतात. कॉल येताच मदतीसाठी आमचे पथक जाते. तक्रार खरी, खोटी हा नंतरचा भाग आहे. आम्ही दुर्लक्ष करत नसल्याची माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली.
अशी आहे आकडेवारी जिल्हा – आलेले कॉल – मदतीची वेळ
मीरा-भाईंदर – ७९७१६ – २.३७
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – २३२३ – २.५६
ठाणे शहर – १४५८४६ – ४.४१
धुळे – १३५९५ – ५.७
धाराशिव – १७२८१ – ५.११
परभणी – १४६६५ – ५.१८
नागपूर ग्रामीण – २११७४ – ५.२२
छत्रपती संभाजीनगर शहर – ४८००२ – ५.२७
नाशिक शहर – ५३७९० – ५.३२
ठाणे ग्रामीण – १२७२९ – ५.४०
नवी मुंबई – ९३५६२ – ५.४६
गोंदिया – ८५२६ – ५.५०
सातारा – २८०२२ – ५.५३
पुणे शहर – २२१६८३ – ५.५७
पुणे ग्रामीण – ६१३२१ – ५.५७
बुलढाणा – १७०८७ – ६.१५
पिंपरी चिंचवड – १२०६३७ – ६.१८
कोल्हापूर – ३०८३३ – ६.३३
पालघर – ११५४३ – ६.५९
नागपूर शहर – १२५६१० – ७.०५
अमरावती शहर – २२०३१ – ७.११
रायगड – १६८७७ – ७.२१
गडचिरोली – ४२११ – ७.२५
सोलापूर ग्रामीण – ३२४९७ – ७.२५
हिंगोली – ९९७६ – ७.२९
वाशिम – १३५१२ – ७.३४
बीड – २२२०० – ७.५३
सोलापूर शहर – २२७२२ – ८.४
नांदेड – २८६५९ – ८.२३
चंद्रपूर – २०३१५ – ८.३०
लातूर – ३११२० – ८.३०
अमरावती ग्रामीण – १८१४० – ८.३८
यवतमाळ – १८५०३ – ९.००
रत्नागिरी – ५८२७ – ९.५
अकोला – १५१०८ – ९.१४
जालना – १८४४० – ९.१५
नंदुरबार – ४३८४ – ९.४४
जळगाव – २३४५५ – १०.३
सांगली – ३१९२२ – १०.३
सिंधुदुर्ग – ३९५० – १०.१०
वर्धा – १४७९६ – १०.१५
अहिल्यानगर – ४९०२६ – १०.१९
नाशिक ग्रामीण – २८५०२ – १०.३३
भंडारा – ८४१० – ११.००
मुंबई शहर – १०४०७७ – २१.५०
एकूण – १७२५७०८ – ६.३६