सोलापूर : मागणीअभावी गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर २५ ते २७ रुपयांपर्यंत घसरले असून विक्री देखील वाढलेली नाही. दुसरीकडे बिअर, विदेशी दारू व वाईनच्या किमती ३५० ते ७५० रुपये लिटरपर्यंत असतानाही गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत तब्बल साडेसहा ते साडेदहा टक्क्यांनी मद्यविक्रीत वाढ झाल्याची वस्तुस्थिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील आकडेवारीतून समोर आली आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात आठ महिन्यात तब्बल ८८० कोटींची मद्यविक्री झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात तब्बल पावणेदोन कोटी लिटर दारूची अधिकृत विक्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे झाली आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षभरात मद्यविक्रीसह अन्य बाबींमधून राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर कार्यालयाला १६६ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट आहे. त्यातील आठ महिन्यात जवळपास ८० कोटींचा महसूल मिळाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील अनधिकृत हातभट्ट्यांवर छापे टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अंदाजे ६० कोटींहून अधिक रुपयांची हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन जप्त तथा नष्ट केले आहे. तसेच हॉटेल, ढाब्यांवर बेकायदेशीर मद्यविक्री व विदेशी दारूची वाहतूक व विक्रीवरील कारवाई देखील कोट्यवधींची आहे. ग्रामीण पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली आहे. अवघ्या आठ महिन्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातच एक हजार कोटींची मद्यविक्री होते हे यावरून स्पष्ट होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या काळात पावणेसहा लाख लिटर विदेशी दारूचा खप वाढला आहे. तसेच साडेपाच लाख लिटर बिअर तर पाच हजार लिटर वाईनची विक्री देखील वाढल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.