सिहोरा : प्रतिनिधी
उभ्या ऊसपिकाची तोडणी झाली नसल्याने शेतक-यांनी उसाचे पीक जाळायचे काय, असा प्रश्न परसवाडा गावातील संतप्त शेतक-यांनी उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात लवकर उसाची कापणी आणि उचल झाली नसल्याने या परिसरातील ४०० एकरांतील शेतक-यांना फटका बसण्याची वेळ आली आहे. मानस अॅग्रो प्रा. लि. देव्हाडा ऊस कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने दखल घेण्याची मागणी शेतक-यांकडून होत आहे.
वैनगंगा नदीच्या खो-यात असणा-या परसवाडा शेतशिवारात उसाची लागवड केली जाते. या परिसरात ६०० ते ७०० एकर शेतीत शेतक-यांनी उसाचे उत्पादन घेतले आहे. या सर्व उसाची उचल होण्याची अपेक्षा असताना मानस अॅग्रो कारखान्याने फक्त १५० ते २०० एकर शेतीतील उसाची उचल केली आहे. उर्वरित ४०० एकर शेतीत उसाचे पीक तोडणीच्या प्रतीक्षेत आहे.
ऊसतोड कामगारांना वेतन न मिळाल्याने कामगारांच्या टोळ्या गावाकडे परतल्या आहेत. यामुळे शेतक-यांत चिंता निर्माण झाली आहे. येत्या १० दिवसांत उसाची तोडणी आणि उचल झाली नाही तर, संपूर्ण उभे पीक जाळून टाकण्याचा इशारा संतप्त शेतक-यांनी कारखान्याला निवेदनातून दिला आहे. त्यात अंकुश हुड, अरुण राऊत, अतुल नंदरधने, नरेश राऊत, बाळकृष्ण विठुले, वसंता पांडे, गंगाधर गौपाले, अनिल लांडगे, गोविंदा शेंडे व ३५ शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहे.
शेतक-यांना चिंतेने ग्रासले
जवळपास ४०० एकर शेतीत ऊस उभा आहे. लवकरच उन्हाळा सुरू होत आहे. वेळीच कापणी आणि उचल झाली नाही तर वजनात घट होण्याची शक्यता असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतक-यांना बसणार आहे. कारखान्यात प्रति टनामागे जळीत कापले जाते. त्याचाही फटका शेतक-यांना बसत असतो. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतक-यांना यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
मजुरांकडून वाढीची मागणी
मजुरांनी ऊस तोडणीसाठी थेट दरात वाढीची मागणी केली आहे. प्रति टनामागे २०० रुपयांची वाढ ऊस उत्पादक शेतक-यांना झेपण्यासारखी नाही. यासंदर्भात कारखान्यात तक्रार केली तर, कारखाना व्यवस्थापन दाद देत नाही. यामुळे वाढीव मजुरी दिली नाही तर शेतातच ऊस वाळण्याची भीती आहे. ती दिली तर आर्थिक बजेट कोलमडण्याचा धोका आहे. यामुळे करावे तरी काय, अशी अवस्था आहे.
जळीत ऊस कपातीला शेतक-यांचा विरोध
जळीत ऊस कारखान्यात गेल्यास यापोटी कारखान्याकडून २० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र याला शेतक-यांचा विरोध आहे. उसाचे फड जाळल्याशिवाय तोडणी करत नाहीत. यामुळे होणारे नुकसान आमचेच असते. तरीही कारखान्याकडून पुन्हा २० टक्के रक्कम कपातीचे धोरण अन्यायकारक असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. अशातच कधी सुरू तर कधी बंद अशी कारखान्याची अवस्था आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत.