नवी दिल्ली/मुंबई : नुकताच दक्षिण कोरियाचा बॅचलर टाइम बॉम्ब प्रत्यक्षात आता फुटण्याच्या मार्गावर असल्याची बातमी प्रसार माध्यमांवर झळकली आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या समस्त नवरदेवांचे काळीज धक्क उडाले. मुळात पुरूष आणि महिलांच्या तुलनेचे प्रमाण जगभरात कमीच आहे. दरम्यान महाराष्ट्रात लिंग गुणोत्तराची ही स्थिती असूनही ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हे भयानक वास्तव आज खेडोपाडी बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर १००० मुलांमागे केवळ ९२३ मुली असल्याने ७७ पुरूष अविवाहित राहणार की काय ही भीती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. जगभरात जन्मावेळी स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये ३० वर्षांचे ऐतिहासिक असंतुलन निर्माण झाले असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
मागच्या दीड-दोन दशकात ग्रामीण समाजव्यवस्था झपाट्याने बदलत गेली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती या गोष्टी या बदलास कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर लोकांच्या मानसिकतेतही झपाट्याने बदल झाले. पेशाने शेतकरी असले, आपली मुलगी कमी जरी शिकलेली असली तरीही मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरी असलेला जावई पाहिजे ही मानसिकता झाली. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाचे वाढलेले लग्नाचे सरासरी वय आणि मुलींच्या आईवडिलांची बदललेली मानसिकता यामुळे लग्नाची समस्या आणखीनच गडद होत चालली आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये मुलींपेक्षा जास्त मुले जन्माला येतात. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी किमान २.१ चा दर आवश्यक आहे. मात्र आता परिस्थिती गंभीर होत असल्याने जगाचे संतुलन कसे राखणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
काय आहे महाराष्ट्रातील स्थिती?
महाराष्ट्रातील १२ जानेवारी रोजी नमुद केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्या १२ कोटी ४९ लाख ४ हजार ७१ आहे. तर त्यात पुरूषांची संख्या ६ कोटी ४७ लाख ५० हजार ६८५ तर महिलांची संख्या ६ कोटी १ लाख ५३ हजार ३८६ आहे. या दोन्हीतील फरक बघता भविष्यात ४५ लाख ९७ हजार २९९ पुरूष अविवाहित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच गुणोत्तरीय प्रमाण १००० पुरुषांमागे केवळ ९२३ महिला असल्याने हजारामागे ७७ पुरूषांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत.
महाराष्ट्रातील गुणोत्तरीय प्रमाण
(जानेवारी२०२४)
एकूण लोकसंख्या – १२,४९,०४,०७१
पुरुष – ६, ४७,५०,६८५
महिला – ६,०१,५३,३८६
फरक – ४५,९७,२९९
सोलापूर आणि कोल्हापूरात नवरदेवांची आंदोलने
गतवर्षी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने तरूणांनी नवरदेवाचा साज चढवून फेटा बांधून, घोड्यावर बसून वाजंत्रींसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला. या मोर्चात तब्बल २५ इच्छूक नवरदेवांनी सदर मोर्चात सहभाग नोंदविला होता. तर कोल्हापुरातही अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आले. सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज १०० मागे १२ ते १५ मुले लग्नाची राहिलेली आहेत. हे प्रमाण ५ वर्षाने वाढेल आणि प्रमाण २० ते २५ होतील अशी भीती तरुणांनी वर्तविली आहे.
लग्नाचे वय तिशीच्या वर
मागच्या एक ते दीड दशकापासून ही समस्या आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचे सरासरी वय २१-२२ वर्षावरून थेट तिशीच्या वर पोहचले आहे. ही समस्या फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात पण दिसून येते पण ग्रामीण भागातील ही समस्या प्रकर्षाने जाणवते.
मुलींच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढल्या
देशात महिलांचे प्रमाण हजार पुरुषामागे कमी असल्यामुळे साहजिकच मुलींच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी चांगले स्थळ मिळेल अशा अपेक्षा आहेत. जुन्या चालीरीतीप्रमाणे लग्नाचे प्रकार सध्या कमी झालेले आहेत. जुन्या पद्धतीच्या चूल आणि मूल या संकल्पनेला झुगारुन मुली आधुनिकतेची आस धरताना आपल्याला पहायला मिळत आहेत. शेतकरी असणारे लोकंच शेतीला दुय्यम समजू लागल्यामुळे शेतकरी मुलीच्या अपेक्षा वाढल्या आणि जो तरुण पुण्यामुंबई सारख्या शहरात नोकरीला आहे अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असे लोकांना वाटू लागले आहे.