सोलापूर : बोरांच्या बागांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दर मात्र दहा वर्षांपूर्वीचे असून आता या बागा आता ठेवायच्या की काढायच्या? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
मोडनिंब व परिसरात अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, ढेकळेवाडीसह मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये बोरांच्या बागा मोठ्या प्रमाणात होत्या. मोडनिंबच्या आडत बाजारात व अन्य ठिकाणी जे बोर खरेदी करणारे व्यापारी येत होते, ते दररोज ५० ट्रक भरून दिल्ली, कोलकाता, जयपूर, सुरत, राजकोट, हैदराबादसह अन्य भागात पाठवत होते.
दहा वर्षापूर्वी बोरांचे दर पंधरा ते वीस रुपये किलो होते आणि त्यासाठी लागणारा बारदाना दहा ते बारा रुपयांना मिळत होता. मजुरांना पगार शंभर रुपये होता. आजही मार्केटमध्ये १५ ते १७ रुपये किलो दराने बोरांची खरेदी केली जात आहे. आज बारदाना ३५ ते ४० रुपयांना असून, वाहतूक खर्चही वाढला आहे. महिलांना मजुरी तीनशे रुपये, तर पुरुषांना पाचशे रुपये पगार द्यावा लागतो. मात्र, दरात कसलाच बदल झालेला नाही. त्यामुळे दररोज दहा हजार पिशव्यांची होणारी आवक हजार ते दीड हजार पिशव्यांवर येऊन ठेपल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. मोडनिंबच्या बाजारपेठेत बोराची आवक घटली असून, चांगल्या मालाची चाळणी केली जात आहे.
शेतकर्यांच्या पंधरा ते वीस वर्षापूर्वीच्या बागा आहेत. दरामध्ये वाढ न होता दहा वर्षापूर्वीचे आहेत. मात्र, इतर महागाई वाढली आहे. त्यामुळे या बागा काढायच्या की ठेवायच्या ? असा प्रश्न उभा आहे. मजुरी, बारदाना, वाहतूक खर्च वाढला आहे. फवारणीसह इतर औषधाचा खर्च वाढला. वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. भाव १२ ते १५ रुपये किलो राहिला आहे. ३० ते ४० रुपये किलो दराने भाव मिळणे आवश्यक आहे. सध्या मार्केटमध्ये बोरांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव जुनाच आहे. त्यामुळे खप कमी आहे. नव्या पिढीत बोराची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे.