18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्ररस्ता नसल्याने मृतदेह खांद्यावर घेत १५ कि.मी.ची पायपीट

रस्ता नसल्याने मृतदेह खांद्यावर घेत १५ कि.मी.ची पायपीट

तापानं दोन लेकरं हिरावली

गडचिरोली : आजोळी गेलेल्या दोन मुलांना अचानक ताप भरला. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. गावातीलच पुजा-याकडे या मुलांना जडीबुटी देण्यात आली होती. त्याचा काहीच गुण आला नाही. मुलांना सरकारी दवाखान्यात न्यायचे तर पक्का रस्ताच नसल्याने अ‍ॅम्ब्युलन्स नाही, दुसरे वाहन नाही.
पण दुर्गम भागातील जिणे नशिबी आल्याने या दोघांना वाचवता आले नाही. दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांना १५ किलोमीटरची पायपीट करावी लागली. या दुर्दैवी घटनेवर जिल्हा परिषद कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप जिल्हा परिषदमार्फत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका अंतर्गत येणा-या ‘येर्रागड्डा’ येथील रहिवासी रमेश वेलादी यांच्या मोठा मुलगा मोतीराम वेलादी (सहा वर्षे) व दिनेश वेलादी (साडेतीन वर्षे) या दोन मुलांना ताप आला. एका पुज-याकडून जडीबुटीची औषधे देण्यात आली. परिस्थिती गंभीर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. सध्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या मुलांना मलेरिया झाल्याची प्राथमिक माहिती गावक-यांनी दिली.

जिमलगटा येथे पोहोचल्यानंतर या दोन भावंडांचा मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णवाहिका मागितली. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रागात पालकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटरचा प्रवास केला. या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करीत असून या गंभीर प्रकरणावर जिल्हा परिषद कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR