लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘सिंफनी ऑफ इंडिया, भारत की गुंज‘ या रियालिटी शो मध्ये लातूरच्या कन्या व दयानंद कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आसावरी बोधनकर जोशी हिला भारतातून सर्वप्रथम पुरस्कार ‘स्टार ऑफ द सिझन अवॉर्ड‘ प्राप्त झाला. त्यामुळे दयानंद कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. आपल्या भारतातले विविध कलाकार आणि त्यांच्या कलेच्या एकत्रीकरणातून साकार झालेली सिंफनी भारताच्या बाहेर इतर सर्व देशात पोहोचली पाहिजे या उद्देशाने डी डी १ या राष्ट्रीय वाहिनीवरून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले आहे.
या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून २५० कलाकार मेगा ऑडिशन्ससाठी निवडले होते. त्यातून अंतिम ८० कलाकार शोसाठी निवडले होते. त्यात वादक, गायक, काँपोझर इत्यादी कलाकारांचा सहभाग होता. एकूण २७ भागात हा कार्यक्रम झाला. यासाठी प्रसिद्ध राजस्थानी लोकगीत गायक स्वरूप खान, पार्श्वगायिका श्रुती पाठक, रोनु मुजुमदार, (बासरी वादक),सुनीता भुईया (व्यायोलीन वादक), राकेश चौरसिया (बासरी वादक), तौफिक कुरेशी (झेंबे आणि विविध तालवाद्य), तन्मय बोस (तबला, विविध तालवाद्य), सोमा घोष (प्रसिद्ध ठुमरी गायन, शास्त्रीय गायन), पूरबायन चॅटर्जी (सितार वादक) हे विशेष ग्रॅमी अवॉर्ड प्राप्त जागतिक स्तरावरचे सर्व कलाकार परीक्षक म्हणून लाभले होते.
या कार्यक्रमात काही वैयक्तिक व समूह सादरीकरण होते. उपांत्य फेरीत ७ संघ सामील झाले होते. त्यात आसावरी व समूह यशस्वीरित्या पुढे आला आणि शेवटी अंतिम फेरीत मध्ये भारतातून ५ संघात मध्ये अटीतटीची स्पर्धा झाली व यात त्यांचा संघ विजेता ठरला. या कार्यक्रमात आसावरी हिला एकदा ‘परफॉर्मर ऑफ द डे‘ हा बहुमान मिळाला. या बरोबरच ‘स्टार ऑफ द सिझन‘ हा अवॉर्ड हा पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मे महिन्यात सादरीकरण होणार आहे. त्यांच्या हस्ते आसावरी व इतर विजेत्या संघाला बक्षिस स्वरूपात धनादेश मिळणार आहे. त्याचबरोबर डीओ म्युझिक या दाक्षिणात्य मुझिक कंपनी सोबत करार झालेला असून त्यांच्याद्वारे देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर भारताचे नेतृत्व करण्यासाठी विविध देशात हा समूह सादरीकरासाठी जाणार आहे.
यातील सर्वच गाणी नवीन असून ती आसावरीनी स्वरबद्ध करून गायली होती. या संघात आसावरी बोधनकरसमवेत ऋषिकेश करमरकर (नागपूर),आदित्य टीटोरिया( डेहराडून), आशी टीटोरिया (डेहराडून), धर्मांशू पाठक गुजरात, प्रथम कुमार (दिल्ली),चिराग तोमर ( गाजियाबाद),साहिल वर्मा (उत्तरप्रदेश),संजय (आसाम), नयन कृष्णा (आसाम) शंतनु सिंग (पंजाब). आसावरी यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललीतभाई शाह, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दीक्षित, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदीपान जगदाळे, प्रा. शरद पाडे, प्रा. सोमनाथ पवार, प्रा विजय मस्के, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे.