24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाण यांचा अपेक्षेप्रमाणे भाजपात प्रवेश

अशोक चव्हाण यांचा अपेक्षेप्रमाणे भाजपात प्रवेश

मुंबई : अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षांतर करण्याचा निर्णय आपल्यासाठी खुप कठीण होता. त्यासाठी खूप विचार करावा लागला. माझ्या जिल्ह्याचा, राज्याचा व देशाच्या विकासाचा विचार करून मी हा निर्णय घेतला. आजवर मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. आता नवीन सुरुवात करतो आहे, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तर दुस-यावर आरोप करण्यापेक्षा जनतेशी नाळ असलेल्या मोठ्या नेत्यांना आपण का सांभाळू शकत नाही याचे आत्मंिचतन काँग्रेसने करावे, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. आणखीही काही लोक भाजपात येणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.

अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हाच ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण स्वत: चव्हाण यांनी अजून आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते. मात्र स्वत:चे शब्द हवेत विरण्यापूर्वीच त्यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहोळा झाला.

पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, पक्ष सोडणे हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. हा निर्णय सोपा नव्हता. बराच विचार करून हा निर्णय घेतला आहे. राजकारणामध्ये मी नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन काम केले आहे. मी विरोधी पक्षात असताना आमच्या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने मला खुप दिलेय हे मी नाकारत नाही. पण मी ही काँग्रेससाठी केलेले काम कोणाला नाकारता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला जी गती दिलीय त्याला साथ देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. ३० वर्षांनंतर राजकीय प्रवासात बदल करत आहे, भाजपामध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करणार आहे.

मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. तीच भूमिका घेऊन भाजपातही प्रामाणिक काम करेन. आगामी निवडणुकीत देशात आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा मिळतील. पक्षाला माझ्या अनुभवाचा फायदा होईल असे चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबददल बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, काही विरोधात बोलत आहेत तर काही समर्थनार्थ बोलत आहेत. आामच्यात मतभिन्नता असली तरी मी व्यक्तिगत दोषारोप करणार नाही. पंतप्रधान मोदी यांचे सब का साथ सबका विकास हा नारा दिला आहे. विकासाचे विविध पैलू आपण पाहत आहोत. आम्ही विरोधात असताना व्यक्तिगत टीका कधी केली नाही. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन आणि देवेंद्र फडणवीस सांगतील ते काम मी करेन असेही ते म्हणाले.

काँग्रेसला आत्मंिचतनाची गरज- देवेंद्र फडणवीस
भाजपला विरोध करता करता आपण देशाच्या विकासाला कधी विरोध करू लागलो याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसला सांभाळता आले नाही. त्यांच्या पक्षात कुणाचा पायपोस कुणात राहिला नाही. पक्ष कुठल्या दिशेने चालला आहे हेच त्यांना कळत नाही. काही नेत्यांना आपले नेतृत्व काय करते हेच कळत नाही. ज्यांनी काँग्रेस मोठी केली ते नेते आपल्याला का सांभाळता येत नाहीत याचे आत्मंिचतन काँग्रेसने करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतर कोणते नेते प्रवेश करणार या प्रश्नावर आम्ही कुठलेही टार्गेट घेऊन चालत नाही. कोणते नेते येऊ शकतात. त्यांचा पक्षाला फायदा होईल याचा विचार करून आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.

जमिनीशी जोडलेल्या नेत्यांना आमची दारे खुली असल्याचे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देणार का? या प्रश्नावर अशोक चव्हाण यांच्यामुळे महायुती आणखी बळकट झाली आहे. ते कोणत्याही अटीशिवाय पक्षात आले आहेत. त्यांना पदाची लालसा नाही. राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी दिली जाईल. कोण अर्ज भरेल आणि कोण नाही याचा निर्णय केंद्रीय भाजप ठरवेल. केंद्रीय भाजपमधूनच उमेदवाराची घोषणा होईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उद्या दुपारी अशोक चव्हाण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

भाजपात प्रवेश केल्यावरही ओठावर काँग्रेसच आले !
प्रवेशाच्या वेळी उपस्थित असलेल्या नेत्यांचा उल्लेख करताना अशोक चव्हाण यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख मुंबई भाजपाचे अध्यक्ष असा करण्याऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्यासह सगळ्यांना हसू आवरता आले नाही. कालपर्यंत काँग्रेसमध्ये होतो, आजच इकडे आलोय, त्यामुळे जुनी सवय जायला, इथे रुळायला थोडा वेळ लागेल, सांभाळून घ्या, असे सांगून अशोक चव्हाण यांनी पुढचे मनोगत व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR