22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरभाजपने ईडीची भीती दाखवल्यानेचव्हाण यांनी राजीनामा दिला: आ.प्रणिती शिंदे

भाजपने ईडीची भीती दाखवल्यानेचव्हाण यांनी राजीनामा दिला: आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपचं कमळ हातात घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला होता. काँग्रेसमधील डॅमेजनंतर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. यावर बोलताना मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी दुर्दैवी गोष्ट आहे, भारदस्त नेता होते. पण हे भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जात आहे.

आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत, मी आणि साहेबांनी (सुशील कुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते पुढे काय करणार हे आता त्यांनी सांगितलेलं नाही. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या. त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही. पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अजूनही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

माझ्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्याकडे कोणत्याही संस्था नाही. त्यामुळे ईडीची भीती ते दाखवू शकत नाहीत. पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत. त्यानुसार मला भाजपचे विचार पटत नाहीत. इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही. पक्ष नेतृत्व सर्वांच्या संपर्कात आहे. काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे, भाजप केवळ आम्ही अस्थिर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या नेत्यांवरती प्रेशर आणून सायकॉलॉजिकल गेम ते खेळत आहेत. काँग्रेस हा विचार भाजप कधीही संपवू शकणार नाही.

आम्हाला कल्पना आहे की आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप. त्यासाठी महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत राहतील. वंचित बहुजन आघाडीदेखील सोबत राहील, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR