22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर जाणार!

अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर जाणार!

कॉँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा दिला राजीनामा, नार्वेकरांची घेतली भेट

मुंबई : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, त्यानंतर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. हे धक्के अजून पचलेले नसतानाच आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासह नांदेड जिल्हयातील मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण), जितेश अंतापूरकर (देगलूर) माधवराव जवळगावकर (हदगाव) हे आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार आहेत. विश्वजीत कदम,  अस्लम शेख, अमीन पटेल, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, अमित झनक हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यात माजी आमदार हनमंत बेटमोगरेकर आणि रमेश बागवे हे अशोक चव्हाणांसोबत असल्याची माहिती आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.

यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. अशोक चव्हाण हे आता भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी अटकळ बांधली जात आहे. भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नार्वेकरांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉट रिचेबल
आज सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आणि त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. नार्वेकर-चव्हाण यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र ना अशोक चव्हाण ना भाजपचे इतर नेते, कोणीही यावर स्पष्ट भाष्य केले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा नेमका मनसुबा काय यावर विविध तर्क लावण्यात येत होते. त्यानंतर दुपारी अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे एकच गदारोळ माजला. महाराष्ट्र काँग्रेसमधील या मोठ्या भूकंपानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले.

अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर जाणार!
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजपतर्फे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. रविवारी भाजपची राज्यसभेची यादी जाहीर झाली होती. उत्तर प्रदेशापासून ते पश्चिम बंगालपर्यंतच्या उमेदवारांची नावे त्यात घोषित करण्यात आली. पण महाराष्ट्रातील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. चव्हाण हे भाजपमध्ये येणार असल्यामुळेच भाजपने महाराष्ट्रातील यादी जाहीर केली नसल्याची आता चर्चा आहे. आज संध्याकाळपर्यंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतरच भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असे वृत्त आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यामुळे नांदेडमध्येच आहेत. परंतु त्यांची भूमिका देखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहील, असे बोलले जात आहे. जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय संकेत आहेत.

नांदेडच्या बंगल्यावर शुकशुकाट
नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना देखील अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाचा राजीनामा दिल्याची माहिती नाही. त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी शुकशुकाट पहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR