नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झाले नसते. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.
अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने ‘मामा’अशी हाक मारतात. अशोक मामांचा जन्म १९४७ साली मुंबईतच झाला. १९६९ पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केले. ‘जानकी’ या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी ‘आयत्या घरात घरोबा’,’अशी ही बनवाबनवी’,’बाळाचे बाप ब्रह्मचारी’,’भूताचा भाऊ’,’धुमधडाका’सह ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. ‘सिंघम’ मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’ या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या.