मुंबई : जगभरातील चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव होणार असून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समितीने या महोत्सवाची रुपरेषा सांगितली आहे. यात आशुतोष गोवारीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. आयोजक समितीने चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबाबत सदस्यांची नावे जाहीर केली असून त्यात आशुतोष गोवारीकर आणि सुनील सुकथनकर या नामवंतांचा समावेश आहे.
आशुतोष गोवारीकर यांनी लगान, स्वदेश, जोधा अकबर, पानिपत अशा ऑस्कर नामांकीत सिनेमांचे दिग्दर्शन केले असून चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातील हे मोठे नाव आहे. भारातीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचवणारे हे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आहेत. मागील २५ ते ३० वर्षांपासून भारतीय सिनेमाचे जगभरात उल्लेखनीय नाव होण्यात गोवारीकरांचा मोठा सहभाग आहे.
गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रीयेने भारतीय चित्रपटसृष्टीत मागील तीन दशकांपासून भक्कम योगदान दिले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या आशुतोष गोवारीकर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही छाप सोडली आहे.