मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपाचे आमदार सुरेश धस हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता पुन्हा एकदा धस यांनी मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
धस यांनी कृषी विभागीय सचिव विकासचंद रस्तोगींना पत्र दिले आहे. या पत्रात धस यांनी तत्कालीन कृषिमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या, असे म्हटले आहे. तत्कालीन कृषिमंत्री आणि अधिका-यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
यासोबतच धस यांनी २०२३ ते २०२५ पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहितीही मागवली आहे. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहितीही सुरेश धस यांनी मागितली. खरेदीच्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ््या तक्रारी असल्याचे सुरेश धसांचे म्हणणे आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांना माफ करा, म्हणताना सुरेश धस दिसले, ज्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.