नवी दिल्ली : विधानसभांच्या निवडणुकांकडे आता लक्ष लागले आहे. यानुसार महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियानातील तयारी जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रातही याच आठवड्यात आयुक्तांचा आढावा दौरा अपेक्षित आहे.
तिन्ही राज्यांच्या विधानसभा एकाचवेळी होण्याची शक्यता असून सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निवडणुकीच्या वेळापत्रकाची आखणी केली जात आहे. राज्य विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसेच अन्य आयुक्त ज्ञानेशकुमार आणि डॉ. एस. एस. संधू यांनी आज चंडीगडमध्ये हरियानातील निवडणूक तयारीची माहिती जाणून घेतली. ९० जागा असलेल्या हरियाना विधानसभा निवडणुकीची मुदत तीन नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. हरियानात सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. हरियानामध्ये दोन दिवसांच्या दौ-यावर असलेल्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
हरियानानंतर तिन्ही आयुक्त याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रात निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. राज्यात होणा-या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांची महाविकास आघाडी असा मुकाबला असला तरी बहुतांश मतदारसंघांत तिरंगी मुकाबला होऊ शकतो. ८१ सदस्यसंख्या असलेल्या झारखंड विधानसभेची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपणार असली तरी एकत्रित निवडणुकीची शक्यता पाहता झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक अलीकडे होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपची शनिवारी बैठक
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिका-यांची शनिवारी बैठक
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिका-यांची येत्या शनिवारी दिल्लीत बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, पदाधिकारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य प्रभारी हजर राहणार असल्याचे समजते. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.
नवीन अध्यक्षासाठी विचार सुरू
आगामी विधानसभा निवडणुका, सदस्यता नोंदणी मोहीम तसेच लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर बैठकीत चर्चा होणार आहे. जोपर्यंत पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडला जात नाही, तोपर्यंत कार्यकारी अध्यक्ष नेमण्याबाबत पक्षात विचार सुरु आहे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत नवा अध्यक्ष मिळणे अपेक्षित आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ मागील जून महिन्यात संपला होता. मात्र जोपर्यंत नवीन नियुक्ती होत नाही, तोपर्यंत कार्यभार सांभाळण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.