22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीय७ राज्यांत विधानसभेची रणधुमाळी!

७ राज्यांत विधानसभेची रणधुमाळी!

नवी दिल्ली : सात राज्यांतील विधानसभेच्या १३ जागांसाठी येत्या १० जुलै रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी देण्यात आली. विधानसभा सदस्यांचा राजीनामा अथवा त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

ज्या १३ मतदारसंघात मतदान होणार आहे, त्यात पश्चिम बंगालमधील ४, हिमाचल प्रदेशातील ३, उत्तराखंडमधील २ तर मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, तामिळनाडूमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील ९ आमदार अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. या जागांसाठी निवडणूक आयोगाला भविष्यात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. १० जुलै रोजी प. बंगालमधील राणाघाट दक्षिण, रायगंज, बागदा आणि मानिकताला या मतदारसंघांत मतदान होईल. यातील पहिल्या दोन मतदारसंघातील आमदारांनी राजीनामा दिला होता तर इतर दोन मतदारसंघातील आमदारांचे निधन झाले होते.

हिमाचलमधील देहरा, हमीरपूर आणि नालागड मतदारसंघात तेथील आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. उत्तराखंडमधील बदरीनाथ मतदारसंघात राजेंद्र भंडारी यांनी राजीनामा दिल्याने येथे निवडणूक होत आहे. तर अन्य एका मतदारसंघात आमदाराचे निधन झाल्याने तेथे मतदान घ्यावे लागत आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि पंजाबमधील क्रमश: अमरवाडा, रुपौली आणि जालंधर पश्चिम येथे आमदारांच्या राजीनाम्यामुळे तर तामिळनाडूत विकरावंडी येथे आमदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR