22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभेचे निकाल अविश्वसनीय

विधानसभेचे निकाल अविश्वसनीय

शरद पवारांचे १० व अजित पवारांचे ४१ आमदार निवडून येतात हे पटतच नाही राज ठाकरे यांनाही ईव्हीएम वर संशय, भाजपवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातील कोणालाही पटलेले नाहीत. जे निवडून आले आहेत त्यांनाही विश्वास बसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघा चार महिन्यात एवढा बदल होऊच शकत नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे अवघे १० आमदार निवडून येतात व अजित पवार यांच्या पक्षाला ४१ जागा मिळतात हे महाराष्ट्रातील कोणालाही पटलेले नाही, असे सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांमध्ये आपलाही सुर मिसळला.

लोकांनी मनसेला मतदान केलेय,पण ते आपल्यापर्यंत पोचलेले नाही,असा आरोप त्यांनी केला. भाजपचे नेते भेटायला आले म्हणजे त्यांच्याबरोबर युती होईल, असे समजू नका, हे स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी भाजपावरही खरपूस टीका केली.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत माहविकास आघाडीच्या शंभरहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाशी मधुर संबंध असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पक्ष पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलताना विधानसभेचे निकाल अनाकलनीय, अविश्वसनीय असून, महाराष्ट्रातील कोणालाही ते पटलेले नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सन्नाटा होता.

जे जिंकले त्यांनीही जल्लोष केला नाही. कारण त्यांचाही विश्वास बसत नव्हता. जे निवडून आले आणि सत्तेत आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांनाही शॉक बसला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती मध्यंतरी मला भेटली. त्यांनाही हा निकाल पटला नव्हता. मनसेचे राजू पाटील यांच्या मतदारसंघात १४०० लोकांचे एक गाव आहे. दरवेळी त्यांना तेथे मोठे मतदान होते. त्या गावात त्यांना यावेळी एकही मत मिळाले नाही. एकही मत मिळत नाही, यावर कसा विश्वास ठेवणार ? काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सातवेळा निवडून आले.

७०-८० हजारांनी निवडून यायचे. यावेळी १० हजार मताने पराभूत झाले. भाजपाला यापूर्वी १२२, नंतर १०५ जागा मिळाल्या होत्या. त्यांचे १३२ आमदार निवडून आले तर समजू शकतो. पण अजित पवार ४१ आमदार निवडून येतात यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? ज्या शरद पवारांनी अनेक नेते घडवले त्यांना १० जागा मिळतात आणि अजित पवारांना ४१ यावर महाराष्ट्रात कोणाचाही विश्वास नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले होते. त्यांचे फक्त १५ आमदार निवडून आले. पवारांचे आठ खासदार निवडून आले होते, पण विधानसभेला त्यांना केवळ १० जागा मिळाल्या. ज्या अजित पवारांचा एक खासदार होता, त्यांचे ४१ आमदार निवडून येतात. सहा महिन्यात असे काय घडले ? असा सवाल करताना, लोकांनी मनसेला मतदान केलेय, पण ते आपल्यापर्यंत आलेले नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. अशा निवडणुका होणार असतील तर निवडणूक न लढलेले बरे, अशी टीका त्यांनी केली.

भाजप नेते भेटायला येतात म्हणजे युती नाही
मनसेची भाजपासोबत युती होण्याची शक्यताही राज ठाकरे यांनी फेटाळली. भाजपा नेते म्हणतात चहा प्यायला घरी येतो त्यांना काय सांगणार? नका येऊ म्हणू का ? मध्यंतरी नाशिकला गेलो होतो, समोरुन चंद्रकांत पाटील आले. नमस्कार वगैरे करुन म्हणाले मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. या म्हणालो. नंतर ते मुंबईत मला भेटायला आले. बाहेर पडल्यावर पत्रकारांनी त्यांना काय चारचाजली म्हणून विचारले ? सदिच्छा भेट होती म्हणून सांगावं ना. चंद्रकांत पाटील यांनी दंडाची बेडकुळी दाखवली, त्याचा अर्थ मला अजूनही कळलेला नाही, अशी खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली. कोणीही भेटायला आले तरी पक्षाचं प्रेम आणि धोरण बाजूला ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसेने वारंवार पक्षाचे धोरण बदलल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी खोडून काढला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सर्व पक्षांनी परिस्थितीनुसार भूमिका बदलल्याची उदाहरणे त्यांनी दिली. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवार, हेमंत बीस्वा सरमा, अशोक चव्हाण यांच्या बाबत भाजपची भूमिका कशी बदलली? यांनी केले तर प्रेम आणि आम्ही केले तर लफडे, असा टोला त्यांनी लगावला. पदाधिका-यांना आत्मविश्वासाने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR