नांदेड : प्रतिनिधी
जेवण करून झाडाखाली झोपलेल्या एका रुग्णाच्या शरीराचे डुकराच्या कळपाने लचके तोडले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय परिसरात शनिवारी सकाळी उघडकीस आली. माणुसकीला काळीला फासणा-या या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (३५) याला गेल्या अनेक वर्षांपासून टिबीचा आजार होता. दि. ३० ऑक्टोबर रोजी विष्णुपुरी येथील कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार झाल्यानंतर दि. ९ नोव्हेंबर रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे वडील नागोराव कसबे यांनी त्याला धनगरवाडी येथील आपल्या गावी नेले. १० नोव्हेंबर रोजी तुकाराम हा परभणी येथील काकाकडे जाण्यासाठी निघाला होता. त्याला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वडिलांनी नांदेड रेल्वे स्टेशनला सोडले होते. परंतू तो परभणीला न जाता परत विष्णुपुरी येथील रुग्णालयात गेला. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले जेवणही त्याने केले.
त्यानंतर रूग्णालय परिसरातील चिंचेच्या झाडाखाली तो झोपला होता.त्यातच रात्रीच्या वेळी डुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात तुकाराम यांच्या दोन्ही गालाचे, नाकाचे आणि कमरेखालच्या भागाचे लचके तोडण्यात आले. शनिवार ११ रोजी सकाळी ही गंभीर बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. येथील पोलिसांनी त्यास अपघात विभागात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच तुकारामच्या वडील नागोराव कसबे यांच्यासह नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. तर नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.