23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार गोडसे वैष्णोदेवीच्या चरणी

खासदार गोडसे वैष्णोदेवीच्या चरणी

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील नाशिक मतदारसंघाचे मतदान पार पडले.आता सगळ्यांना निवडणुकीच्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे. या सर्व धामधुमीत खासदार हेमंत गोडसे जम्मू- काश्मीरला वैष्णोदेवीच्या चरणी दाखल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्याने उमेदवार तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या चाचपणी करण्यात व्यस्त आहेत. अनेक जण कोण विजयी होणार, याचे अंदाज बांधत आहेत. काही कार्यकर्ते मतदानाचा अभ्यास करण्यात गर्क आहेत. या सर्व व्यवस्थेत गेली दोन महिने निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त राहिलेले कार्यकर्ते आता निवांत झाले आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे मतदान संपल्यानंतर निवडक सहका-यांसह वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले आहेत. गोडसे नियमितपणे कटरा येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असतात. निवडणुकीचे मतदान संपल्याने आपण देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि सर्व पदाधिका-यांच्या परिश्रमामुळे हमखास विजय होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

गोडसे म्हणाले, नाशिक मतदारसंघात गेली दहा वर्षे केलेली कामे, सामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी सातत्याने केलेले परिश्रम हे आपले मुख्य बळ आहे. यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मनसे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे विविध पक्ष होते. या सर्वांच्या परिश्रमामुळे मतदारांचा मोठा संपर्क झाला. त्यामुळे प्रचारात देखील पहिल्यापासून आपण आघाडी घेतली होती. त्याचे फलित मतदानातून जाणवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR