मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिस व भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्यामध्ये, आदर्श आचारसंहिता लागल्यापासून कोट्यवधी रुपये आणि मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका एटीएम मशिनसाठी नेण्यात येणारी कारही पोलिसांनी जप्त केली होती.
रात्री उशिरा ही कार एटीएम मशिनमध्ये पैस भरण्यास आल्याने पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर, आता नालासोपारा विधानसभेत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. सदर व्हॅन नालासोपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून या रकमेचा हिशोब मिळत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत.
अहवालानुसार, या एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये आहेत, परंतु या रकमेचा नेमका हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे. त्यावरून पोलिस आता तपास करत आहेत की ही रक्कम एटीएमसाठी होती, की निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार होती. सदर प्रकरणावर पुढील तपास सुरू असून व्हॅनमधील कर्मचा-यांची देखील चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी व्हॅनमधील बॅगांमध्ये असलेली रक्कम जप्त केली आहे. तर विरारच्या मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी ८० लाख एवढी रोख रक्कम कॅश व्हॅनमध्ये सापडली आहे. निवडणूकांच्या आचारसंहितेचा कॅश संदर्भात असलेली नियमावली पाळत नसल्याने, पोलिसांनी कॅश व्हॅन ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
संभाजीनगरमध्येही ४० लाख जप्त
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातही पोलिसांनी ४० लाख रुपयांची रोकड पकडली आहे. निवडणूक भरारी पथकाने ही ४० लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे. शहरातील सूतगिरणी चौकामधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.
भिवंडीत २.३० कोटी रुपयांची रक्कम जप्त
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात नारपोली पोलिस ठाणे हद्दीत पोलिस पथक धामणकर नाका उड्डाण पूलाखाली वाहनांची तपासणी करीत होते. या दरम्यान बँक एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणा-या सीएमएस कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. व्हॅनमधील रोख रक्कमेबाबत व्हॅनमधील कर्मचारी कोणताही कागदोपत्री तपशील अथवा पैशांचे विवरण पुरावे देऊ शकले नाहीत. त्यामुळे, पोलिसांनी या रकमेबाबत भरारी पथकाला माहिती दिली होती, त्यानंतर ही २ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.