सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा येथे रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफ एसआय शहीद झाले तर एक जवान जखमी झाला. बेद्रे कॅम्पमधून सैनिक शोधासाठी निघाले होते, त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे प्रकरण जागरगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. चार दिवसांत जवानांवर झालेला हा तिसरा नक्षलवादी हल्ला आहे, ज्यात एक जवान शहीद झाला आहे.
सकाळी ७ वाजता बेद्रे गावात सीआरपीएफ १६५ व्या बटालियनचे जवान शोधासाठी निघाले होते. शिपाई बाजारमार्गे उरसंगलाकडे शोधत होते. दरम्यान, आधीच घात घालून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळ््या झाडायला सुरुवात केली. मात्र, जवानांनीही वेळीच नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे एसआय सुधाकर रेड्डी शहीद झाले तर दुसरा जवान रामूला गोळी लागली. तो गंभीर जखमी झाला आहे. सहकारी सैनिक त्याला कॅम्पमध्ये घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना एअरलिफ्टद्वारे रायपूरला नेण्यात आले.
४ संशयित पकडले
चकमक थांबल्यानंतर जवानांनी परिसराची झडती घेतली. यावेळी घटनास्थळावरून ४ संशयितांना अटक करण्यात आली. त्यांची पोलिस चौकशी करत आहेत. तसेच घटनास्थळ परिसरात नक्षल्यांचा शोध घेतला जात आहे.