नवी दिल्ली : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सोमवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना इजा करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या वाहनावर कथित हल्ला करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यपालांनी हा दावा केला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या वाहनावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे वाहनामध्येच बसले होते. राज्यपालांनी आरोप केला की, त्यांना शारीरिक इजा करण्यासाठी काही लोकांना पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी दावा केला की, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आदेशाने काही लोक त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. या लोकांनी त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवले. तसेच त्यांच्या वाहनाला धडक दिली. आमचा ताफा जात असताना मार्गात येण्यास कोणालाही परवानगी नव्हती. तरीही काही लोकांना आतमध्ये सोडण्यात आले. त्यांनी कारला धडक दिली आणि पळून गेले.
हल्लामागे मुख्यमंत्री आहेत हे मी नक्की सांगू शकतो. ते माझ्याविरोधात कट रचत आहेत. गुंडांनी तिरुवनंतपूरमच्या रस्त्यांचा ताबा घेतला होता असे राज्यपाल म्हणाले. राज भवनच्या सूत्रांच्या माहितीनुसार, तीन ठिकाणी खान यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. दोन ठिकाणी त्यांच्या वाहनाला धडक मारण्यात आली. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला होता. दरम्यान, काँग्रेस, भाजप यांनी देखील विजयन यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून हल्ल्यामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केलाय. विरोधीपक्षांनी आरोप केलाय की, केलेला आरोप गंभीर असून याप्रकरणी दोषी पोलिसांवर देखील कारवाई करण्यात यावी.