20.2 C
Latur
Saturday, November 30, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबोलिव्हियात सत्ता उलथविण्याचा प्रयत्न

बोलिव्हियात सत्ता उलथविण्याचा प्रयत्न

ला पाज (बोलिव्हिया) : आर्थिक अडचणीचा सामना करणा-या बोलिव्हियात सैनिकांकडून सत्ता उलथण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. दक्षिण अमेरिकी देश बोलिव्हियाची राजधानी ला पाज येथील अध्यक्षीय प्रासादालयावर बुधवारी रणगाड्यांसह सैनिकंनी हल्ला करत मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष लुईस आर्से यांना ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तीन तासांच्या आतच बंडखोरांना अटक करण्यात आली.

बोलिव्हियाच्या दूरचित्रवाणीवरून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बोलिव्हियाच्या सुरक्षा दलाने मुख्य चौकाला घेरले आणि नंतर सैनिकी वाहने अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. यावेळी सैनिकांनी भवनात घुसण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षीय भवनात मंर्त्यांच्या गराड्यात अडकलेले अध्यक्ष आर्से यांनी व्हीडीओ जारी करत म्हटले, देश सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नांचा मी सामना करत आहे. कासा ग्रांड येथे सैन्यांकडून होणा-या दमनशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि बोलिव्हियातील जनतेला संघटित करण्याची गरज आहे.

अर्थात सरकार ताब्यात घेण्याच्या प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर जनरल कमांडर जुआन जोस झुनिंगा यांना पोलिसांनी अटक केली. काल सकाळी सैनिकी बळावर सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सशस्त्र वाहने आणि सैनिक हे ला पाज येथील अध्यक्षांच्या भवनातून माघारी फिरले. अध्यक्ष आर्से यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे आणि नागरिकांनी ऐक्य दाखवत लोकशाहीचे संरक्षण करावे, असे आवाहन केले. त्यांनी नव्या सैनिकी प्रमुखांची घोषणा केली आणि त्यांनी सैनिकांना परत जाण्याचे आवाहन केले.

आर्से म्हणाले, मी आपला कर्णधार असून मी आपल्या सैनिकांना माघारी जाण्याचा आदेश देतो आणि हा आदेश मोडण्याची परवानगी कदापि देणार नाही. तत्पूर्वी सैनिकांनी जनरल झुनिंगा यांच्या नेतृत्वाखाली सरकारी मुख्यालयाबाहेर प्लाझा मुरिलोकडे कुच केली आणि जुने सरकारी मुख्यालय, पॅलेसियो क्युमाडो येथे जबरदस्तीने प्रवेश केला. लष्करीशाहीच्या बळावर सत्ता बदलण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आर्से यांनी जनतेचे आभार मानले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बोलिव्हियाच्या अध्यक्षांनी सैनिकांच्या काही गटांनी नियम मोडल्याबद्दल निषेध व्यक्त केला आणि लोकशाहीचा आदर करायला हवा, अशी अपेक्षा केली. नवनियुक्त सैन्यप्रमुख जोस सांचेझ यांनी सर्व सैनिकांना माघारी जाण्याचे आदेश दिले आणि सध्या रस्त्यावर जे घडत आहे, ते कोणालाही पाहण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले.

पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणूक
२०२५ मध्ये बोलिव्हियात सार्वत्रिक निवडणूक होत असताना तणाव वाढला आहे. डाव्या विचारांचे माजी अध्यक्ष इव्हो मोरालेस यांनी आपले जुने सहकारी आर्से यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी समाजवादी पक्षात फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय राजकीय अस्थिरतेचे ढग निर्माण झाले आहेत. दुसरीकडे बोलिव्हियातील असंख्य लोकांना मोरालेस नकोत. त्यांनी २००६ ते २०१९ या काळात सत्ता गाजविली आहे. मात्र त्यांना तीव्र विरोध केल्यानंतर काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी परंपरावादी हंगामी सरकार स्थापन केले. २०२० मध्ये अर्से यांनी निवडणूक जिंकली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR