वर्धा : येथे मनाला चटका लावणारी घटना घडली. एका महिलेकडून नरबळी देण्याचा प्रकार समोर आला आहे. विहिरीला शेंदूर लावायला वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलले, त्यानंतर तेथून पळ काढला. मुलाचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाचला. त्याने विहिरीतील दोरीचा आधार घेत आपला जीव वाचवला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले होते. १२ वर्षांच्या मुलाला तिने विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला शारदा हिने लगेच विहिरीत ढकलले. त्यानंतर तिने तेथून पळ काढला. मुलाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत विहिरीच्या वर आला आणि आपले प्राण वाचवले. घरी पोहचल्यानंतर बालकाने आई वडिलांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शारदा हिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तपास तात्काळ सुरु केला आहे.