सोलापूर : घरासमोर ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाबरोबर प्रेम जुळले, लग्न करण्याचा दोघांनीही आणाभाका घेतल्या. दरम्यान, तरुणीचे दुसरीकडे लग्न जुळले. दरम्यान, तिने आपण पळून जाऊन लग्न करू, अशी थाप मारून निर्जनस्थळी प्रियकराला बोलावले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात पाच जणांच्या मदतीने तिने प्रियकरावर चाकू, तलवार आणि दगडाने हल्ला केला.
जखमी अवस्थेत घाबरलेल्या प्रियकराने कॅनॉलमध्ये उडी टाकून आपला जीव वाचवला. ही सिनेस्टाईल घटना नातेपुते (माळशिरस) येथील फडतरी रोडलगतच्या कॅनालजवळ घडली. दिनेश चंद्रकांत फडतरे (वय ३०, मोरोची, माळशिरस, सध्या रा. नातेपुते) असे गंभीर जखमी झालेल्या खासगी शिक्षकाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी नातेपुते येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची प्रेयसी अंकिता अंकुश कचरे (वय २०), ओम कचरे (पांढरे मळा, नातेपुते), अनिल अंकुश शिंदे (माण, सातारा) छोटू (पूर्ण नाव नाही) आणि एक अनोळखी इसम, अशा पाचजणांविरुध्द नातेपुते पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. त्यापैकी अंकिता कचरे आणि अनिल शिंदे या दोघांना अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली.