छ. संभाजीनगर : पत्नीने मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिका-याला ठार मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके (५०, रा. जालाननगर) यांनी तक्रार दिली. पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबीयांसह कट रचून विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
कटके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी २००० मध्ये सारिका हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. मात्र, आंतरजातीय विवाह करणा-यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झाला. त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच तिचे वर्तन बदलले. कटके यांच्याकडे स्कोडा कार (एमएच २१, एएक्स ०१०५) आहे. ती कार पत्नी वापरते.
सुरक्षेसाठी या कारला ‘जीपीएस’ यंत्रणा बसवली आहे. ३ मार्च रोजी ही कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचा जीपीएस अलर्ट कटके यांना आला. त्यांनी लगेचच गाडीचा पाठलाग सुरू केला. रात्री साडेआठ वाजता केंब्रिज चौकात ही कार दिसली. तेथे बाजूलाच दुसरी कार (एमएच २१ बीयू ८१११) उभी होती. ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचे कटके यांना माहिती होते. तेथेच उबाळेने देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखले. जातिवाचक बोलून ‘आडवा आलास तर उडवून टाकील,’ अशी धमकी दिली होती. तसेच घरी सारिकाने जातिवाचक शिवीगाळ केली. घरातील नोकरांसमोरच, ‘तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेत,’ असे बोलून अपमान केला. ‘काय व्हायचे ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल,’ अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अघोरी विद्येचा प्रयोग सारिका, विनोद उबाळे, सारिकाची आई सुवर्णाबाई, भाऊ आतिष, मोलकरीण छायाबाई, संगीताबाई या सर्वांनी कट रचून कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला. घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळली. फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तिघांना ३ दिवसांची पोलिस कोठडी
२०२१ मध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरला. त्यामुळे जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली. शाळेचा संपूर्ण कारभार सारिका सांभाळायला लागली. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळे याचे सद्गुरू सदानंद नावाचे हॉटेल होते. शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर तो घेत होता. त्या वेळी त्यांची ओळख झाली. तो मनोज जरांगे यांचा कार्यकर्ता आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांना २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.