30.7 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeमहाराष्ट्रराज्याला पोलिस स्टेट बनवायचा प्रयत्न

राज्याला पोलिस स्टेट बनवायचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता. मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलिस स्टेट आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

एका विनोदी कलाकाराने राजकीय नेत्यावर काही विनोद केला तर त्याचा मोठ्या मनाने स्विकार करायला हवा, त्याकडे एक विनोद म्हणूनच पाहायला हवे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंग तसेच सोनिया गांधी यांच्यावरही अत्यंत जहरी विनोद केले गेले. पण त्यासाठी कलाकार वा कोणा प्रेक्षकांना अशा पद्धतीने वेठीस धरले नाही. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसतानाही त्यांच्या पक्षाने तोडफोड करणे, कामराला धमकी देणे असे प्रकार सुरु आहेत. प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहिला यात त्यांचा काय दोष? कामराला धमकी देणारे, स्टुडिओची तोडफोड करणारे मोकाट आणि कार्यक्रम पाहणा-यांना पोलिसांचा जाच हा कसला न्याय? महाराष्ट्राला पोलिस स्टेट बनवण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा. राज्यातील सरकारची कार्यपद्धती ही चोर सोडून संन्याशाला फाशी देणारी आहे, असे सपकाळ म्हणाले.

भाजप युतीचे सरकार येऊन तीन महिने झाले, या तीन महिन्यात बीड व परभणीत हत्या झाल्या, मुंबईत माजी मंत्र्याची हत्या झाली, सेलिब्रिटींना धमक्या येत आहेत, अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. स्वारगेटच्या बस स्थानकात महिलेवर बलात्कार झाला, राज्यात सेलिब्रिटीपासून सरपंचापर्यंत कोणीही सुरक्षित नाही. कोयता गँग, आका, खोक्या अशा गँग उघडपणे नंगानाच करत आहेत पण गृहखाते व पोलिस विभाग ही गुन्हेगारी रोखू शकत नाही.

पुण्यासारख्या शहरांपासून धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ड्रग्ज खुलेआम विकले जाते त्यावर आळा घालता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नाही. फडणवीसांचे पोलिस फक्त विरोधकांवर कारवाया करणे, विरोधकांचे फोन टॅप करणे, लोकशाही मार्गाने आंदोलन करू न देणे व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR