मुंबई : प्रतिनिधी
बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी संसदेत मांडले जाणार असून उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबद्दल कुतूहल आहे. वक्फ विधेयकाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेही यांची कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडले जाणार आहे. बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
वक्फ विधेयकावरून देशभरात गदारोळ माजला होता. गेल्या वर्षी हे विधेयक संसदेत सादर झाले होते. त्यानंतर ते दोन्ही सभागÞहांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने मूळ विधेयकात काही बदलांना मंजुरी दिली. मात्र संसदेत जेव्हा हे विधेयक सादर झाले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार गैरहजर होते. यामुळे ठाकरे गटावर जोरदार टीका झाली होती. मातोश्रीबाहेर त्यावेळी काही लोकांनी निदर्शनेही केली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गट हिंदुत्वाकडे झुकलेला दिसतेय. त्यामुळे उद्या त्यांचे खासदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी दुपारी १२ वाजता हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात येईल. या विधेयकावर आठ तास चर्चा अपेक्षित आहे. लोकसभेतील रालोआचे संख्याबळ पाहता ते सहज मंजूर होईल. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.