मुंबई : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. बेडेकर हा लोणचे आणि मसाल्यांचा ब्रँड आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो.
१९१० साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसे किराणामालाचे दुकान सुरू केले. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर १९४३ मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असे कंपनीचे नामकरण केले.
फक्त देशात नाही तर ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे बेडेकर उत्पादनही पोहचली. १९६० साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचे निर्यात होऊ लागले. कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास ६०० टन लोणचे सीझनला तयार करण्यात येते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.
धडाडीचा वारसदार हरपला
घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समुहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते.