छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. यातूनच टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. सोबतच बबनराव लोणीकर यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते. दरम्यान, आता या दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्यात एक आमदार दुस-या आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील दोन आमदारांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमामध्ये व्हायरल होत आहे. ज्यात, एक आमदार दुस-या आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि दुसरे आमदार राजेश टोपे यांच्या संभाषणाची ही तथाकथित ऑडिओ क्लिप असल्याचे बोलले जात आहे.
जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादातून या दोन्ही आमदारांचा वाद असल्याचे बोलले जात आहे. बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर यांना उपाध्यक्ष करण्यावरून हा वाद पाहायला मिळतोय. मात्र, राजकीय वर्तुळात या ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.