20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeमहाराष्ट्रआत्या सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

आत्या सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

मुंबई : प्रतिनिधी
पुणे जमीन प्रकरणामुळे पार्थ पवार यांच्यावर आरोप व टीकेचा भडीमार होत असताना, आत्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. पार्थशी आपले सकाळीच बोलणे झाले आहे. मीच त्याला फोन केला होता. त्याने मला आत्या मी काहीच चूक केली नाही असे सांगितल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जमीन गैरव्यवहाराच्या आरोपामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व पार्थ पवार अडचणीत आले आहेत. या प्रकरणावरुन विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणारे मागणी करू शकतात. प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. पण या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे. तहसीलदार व तलाठी यांना कामावरून काढून टाकले. पण ते म्हणतात त्यांनी सहीच केली नाही. हा तहसीलदार तलाठ्यावर अन्याय नाही का. तो गरीब आहे त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरुन काढून टाकणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकार सगळ्यांना कनफ्युज करत आहे.

सरकारने उत्तर द्यावे : सुळे
महाराष्ट्र सरकारचे पहिले स्टेटमेंट आले की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटिस कशी आली. तहसीलदार म्हणतोय मी सहीच नाही केली मग त्याला नोकरीवरुन का काढले. हे सगळे गोलमाल आहे. ही सगळी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे असे त्यांनी म्हटले आहे.अजित पवार आज सरकारमध्ये आहेत. पार्थ पवार सरकारमध्ये नाही. त्यामुळे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

अजित पवारांवर कारवाई करा : दमानिया
पुण्यातील पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी फक्त अधिका-यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. पार्थ पवारांच्या या जमीन व्यवहाराची तक्रार देण्यासाठी मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे. मंगळवारी मी लेखी तक्रार घेऊन त्यांना भेटणार आहे असे दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमात दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR