मुंबई : प्रतिनिधी
देशात औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेब हा क्रूर नाही तर उत्तम प्रशासक होता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदूू-मु्स्लीम अशी नव्हती, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज केला. तर ज्याने संभाजीराजांना हाल करून मारले, हिंदूंची मंदिरे तोडली असा औरंगजेब हा चांगला शासक कसा असू शकतो? असा सवाल करताना, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणा-या अबू आझमीवर देशदेशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतली.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज विधानभवनाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असा दावा करून नवीनच वादाला तोंड फोडले. औरंगजेबाच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताला सोने की चिडीयाँ म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असा दावा त्यांनी केला.
अबू आझमी यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमींवर देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणी केली. याच औरंग्याने संभाजीराजेंचे ४० दिवस ल हाल करून त्यांना मारले. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंग्याला चांगले म्हणणे हे दुर्दैवी आहे. त्याने हिंदूंची मंदिरे तोडली. त्याने गरिबांना लुटले. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावले. असा व्यक्ती चांगला प्रशासक होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला.