22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईट वॉश; मालिका ३-० ने जिंकली

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईट वॉश; मालिका ३-० ने जिंकली

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे. गेल्या १७ वर्षांपासून पाकिस्तानला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्याचाच कित्ता यंदाही गिरवला गेला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३-० ने धोबीपछाड दिला.
क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर व्हाईट वॉश दिला आहे. तिस-या कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या दिवशी सर्वबाद ३१३ धावा केल्या होत्या.

त्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २९९ धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानकडे १४ धावांची आघाडी होती. पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या ११५ धावांवर आटोपला आणि विजयासाठी १३० धावांचं आव्हान देण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान २ गडी गमवून पूर्ण केले. तसेच कसोटी कारकीर्दीच्या अंतिम सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ५७ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून साजिद खानला दोन गडी बाद करण्यात यश आले.

दुस-या डावात ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. साजिद खानने त्याला पायचीत करत तंबूत पाठवले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि लाबुशेन या जोडीने ११९ धावांची भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नर ५७ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने विजयी धावसंख्या केली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला.

पाकिस्तानला या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यापूर्वी पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. पण पराभवामुळे आता सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फायदा झाला असून त्यांनी अव्वल स्थान गाठले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR