बीड : परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का? असा सवाल धस यांनी केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील पोलिसांना माफ करा, असे आवाहन करणारी क्लिप व्हायरल करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली होती. त्याला धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईला चाललेला लाँग मार्च मुंबईला येण्याअगोदरच नाशिकमध्ये थांबला, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पोटशूळ उठले का? असा प्रश्नही धस यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड यांना स्वत:ला असे वाटत असेल की केवळ तेच फुले-शाहू- आंबेडकर वादाचे ठेकेदार आहेत. मात्र, आम्ही सुद्धा त्याच विचारांचे आहोत. त्याच विचाराने आम्ही चालतो, अशा शब्दात धस यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणात सर्व बाजू सकारात्मक घेतलेली आहे. मात्र आव्हाड केवळ निगेटिव्ह का पसरवत आहे? असा सवाल धस उपस्थित केला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील संबंधित पोलिस निलंबित आहेत. त्या संबंधी मी केलेले वक्तव्य मोडून-तोडून दाखवलेले आहे. त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा, असे मी म्हणालो होतो. मात्र ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही. जे व्हीडीओमध्ये दिसत नाही, त्यांना माफ करा, असे मी म्हणालो होतो. मात्र, माझे पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावर कालपासून ट्रायल चालवली जात असल्याचा आरोप यांनी केला आहे.
आव्हाड यांनाही मोर्चा काढण्याचे आवाहन
सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर लाखांचा मोर्चा काढा, असे आव्हान देखील धस यांनी आव्हाडांना दिले आहे. आव्हाडांना हवे असल्यास त्यांनी त्यांच्या ठाणे किंवा मुंबईला मोर्चा काढावा. मात्र, ते न करता मुंबईच्या मोर्चात ते अक्षय शिंदे याचे गुणगान गाऊन माघारी गेले, अशा शब्दात धस यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. अक्षय शिंदे याचे गुणगान ऐकताना ज्या लेकरांवर अत्याचार झाले, त्या लेकरांवर आणि त्यांच्या पालकांना काय वाटले असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्याही खुन्यांना फाशी झालीच पाहिजे, अशी माझी स्पष्ट आणि एकच टप्पी भूमिका आहे. मी दुटप्पी भूमिकेत नसल्याचे धस यांनी म्हटले आहे.