22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरआयुष्मान भारत योजनेचा गरिबांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार

आयुष्मान भारत योजनेचा गरिबांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार

सोलापूर : राज्यातील ९० टक्के गोरगरीब रुग्णांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करणार असल्याचा मानस आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

२८ जुलै २०२३ रोजी आयुष्मान भारत कार्ड योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रिकरणाचा निर्णय झाला असून, या योजनेद्वारे रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेची लवकरच अंमलबजावणी होणार असून, या योजनेसाठी ज्या-त्या भागातील लोकांची मते अजमावण्यासाठी मी राज्यभर फिरणार आहे.

आयुष्मान भारत योजनेसाठी मी राज्य आणि केंद्राचा समन्वयक म्हणून काम पाहात असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ मिळावा, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. ज्या-त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी मी जाणून घेणार आहे. यानंतर राज्याचा अहवाल दिल्लीदरबारी सादर करणार आहे. केंद्रीय स्तरावरून ६० टक्के आणि राज्य सरकारद्वारे ४० टक्के असा मदत निधी या योजनेद्वारे रुग्णांना दिला जातो.

या कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली निवड केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात १ हजार हॉस्पिटलद्वारे या योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार असून, आता ही योजना राज्यातील ३ हजार हॉस्पिटलद्वारे सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर शहरात १२-१३ लाखांच्या आसपास लोक राहत असून, याठिकाणी अवघी ११ रुग्णालये ही योजना राबविण्यात सहभागी आहेत. ही रुग्णालये व आयुष्मान कार्ड वाढविण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेकडून कसलाही प्रयत्न झाला नसल्याबद्दल आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी नाराजी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR