22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रबा. सी. मर्ढेकर युगप्रवर्तक कवी : डॉ. अरुणा ढेरे

बा. सी. मर्ढेकर युगप्रवर्तक कवी : डॉ. अरुणा ढेरे

पुणे : प्रतिनिधी
कविवर्य बा. सी. मर्ढेकर हे युगप्रवर्तक कवी होते. त्यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे स्मारकात रुपांतर झाले आहे. हे स्मारक आता वाङ्मयीन तीर्थस्थळ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केला.

मर्ढे (ता. सातारा) येथे मसाप पुणे शाहुपुरी शाखेच्या संकल्पनेतून साकारलेल्या कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण, स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार. शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश पाटणे, उपस्थित होते.

डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या, सर्जनशील माणसाला दोन आयुष्य असतात एक म्हणजे भौतिक आणि दुसरे म्हणजे त्यांनी केलेले कार्य. मर्ढेकरांच्या साहित्यातून त्यांचे दुसरे आयुष्य लोकांच्या स्मरणात आहे. त्यांनी मराठी भाषा, कवितेच्या सामर्थ्याची उपासना केली. या स्मारकामुळे अनेकांना नवीन प्रेरणा मिळेल. परिसराचे महत्त्व, वैशिष्ट्य येथे येणा-यांना समजावे यासाठी याठिकाणी गाईड असावा, नवकवींसाठी हे स्मारक मार्गदर्शक ठरेल.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मर्ढे कवितेचं गाव व्हावं अशी अनेकांची अपेक्षा असून शासकीय निकष असले तरी खास बाब म्हणून हे गाव कवितेचं गाव होण्यासाठी प्रयत्न करू. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मर्ढेकरांच्या घराची दुरवस्था पाहून खंत वाटली. आपल्या सांस्कृतिक संचिताविषयीची समाजाची अनास्था चिंताजनक आहे. मसापच्या शाहुपुरी शाखेने हे निवासस्थान, त्याचे स्मारकात रुपांतर अतिशय देखणे केले आहे. साहित्य परिषदेच्या कारकीर्दीत हे नूतनीकरणाचे वर्ष आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कामाला मिळालेले मर्ढेकर ग्रामस्थांचे सहकार्य आणि लोकसहभाग ही बाब सकारात्मक आहे. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले व सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले. चंद्रकांत बेबले यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR