नागपूर : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले की, त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांमधील कथित शारीरिक संबंध वासनेमुळे नाही तर प्रेमामुळे होते.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपी नितीन ढाबेराव याला जामीन मंजूर झाला. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांनी सांगितले की, मुलीने सांगितले की ती तिच्या घरातून स्वेच्छेने बाहेर गेली होती आणि संशयित आरोपी २६ वर्षांचा आहे. ते प्रेमसंबंधामुळे एकत्र आले होते.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ‘याचे वय २६ वर्षे आहे आणि ते प्रेमप्रकरणामुळे एकत्र आले.’ न्यायालयाने पुढे म्हटले की, ‘असे दिसून येते की शारीरिक संबंधाची कथित घटना दोन तरुणांमधील आकर्षणामुळे आहे आणि असे नाही की संशयिताने पीडितेवर वासनेतून अत्याचार केला. पीडितेच्या वडिलाने संशयित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांची १३ वर्षांची मुलगी २३ ऑगस्ट २०२० रोजी पुस्तके आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेली होती. पण ती घरी परतली नाही. त्यानंतर वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. यानंतर अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, संशयित आणि तिचे प्रेमसंबंध होते. तिने पोलिसांना सांगितले की, संशयिताने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यानंतर घरातून दागिने व रोख रक्कम घेऊन ती मुलाबरोबर गेली आणि ते दोघे राज्याबाहेर ठिकठिकाणी राहिले.
जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती जोशी-फाळके म्हणाल्या, ‘मान्य आहे की, पीडितेचे वय १३ वर्षे आहे आणि तिची संमती संबंधित नाही. तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. त्याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तिने दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.’
न्यायालयाने असेही नमूद केले की, ‘‘तिच्या (अल्पवयीन) म्हणण्यानुसार असे दिसून येते की ती संशयितासोबत विविध ठिकाणी राहिली आणि त्याने तिला काही जबरदस्ती करून नेले असल्याची कोणतीही तक्रार नाही. यावरून हे उघड आहे की, प्रेमप्रकरणातून ती त्याच्यासोबत गेली.’’
आरोपीवर कलम ३६३, ३७६, ३७६(२), ३७६(३) सह भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४, ६ आणि १७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.