मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सोनिया गांधींचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. मात्र या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केल्याचा दावा करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर राजकारण तापले. अशामध्ये विरोधकांनी या मुद्यांवरून प्रचंड विरोध केल्यानंतर आता गुरुवारी (१९ नोव्हेंबर) स्वत: शायना एनसी यांनी जाहीर माफी मागितली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत एक फोटोही शेअर केला.
शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी पोस्टमध्ये म्हणाल्या की, काही माणसे आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोप-यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते. असे म्हणत त्यांनी एक आठवण शेअर केली. बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंर्त्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता. उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते. असे म्हणत त्यांनी माफी मागितली. त्या पुढे म्हणाल्या की, बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते.
माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर ख-या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की, बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणा-यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा.’’
















