पुणे : प्रतिनिधी
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे २३ व २४ जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी हे संमेलन होत आहे.
मुलांना बालसाहित्याची ओळख व्हावी, त्यांची वाचनाची भूक वाढावी, त्यांच्या चौकस वृत्तीला विहरायला आणखी नवे आकाश लाभावे, नामवंत बालसाहित्यिकांना पाहता यावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, विश्वस्त, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, संवादचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितली
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलन नगरीस ग. ह. पाटील बालसाहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार असून आमदार अतुल बेनके यांची उपस्थिती असणार आहे. शुक्रवारी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. संमेलनात सहभागी होणा-या मुलांना साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साने गुरुजी यांच्या कथांचा संग्रह भेट देण्यात येणार आहे. दोन दिवसीय संमेलनात बालसाहित्यिकांचा सहभाग मोठा असणार आहे.