धाराशिव : प्रतिनिधी
वेळा अमावस्या सणाला शेतात गेल्यानंतर चोरट्यांनी धाराशिव तालुक्यातील बामणी, ताकविकी येथे चोरट्यांनी भरदिवसा घरे फोडून लाखो रूपयांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गुरूवारी दि. ११ जानेवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाणे येथे दि. १२ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील बामणी येथील शेतकरी गोवर्धन गणपती डोंगरे हे गुरूवारी दि. ११ जानेवारी रोजी सकाळी वेळा अमावस्या सणानिमित्त सहकुटुंब शेतात गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या हारत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी स्वंयपाक घरातील लोखंडी कपाटात सोयाबीन विक्रीतून आलेली रोख रक्कम १ लाख ८० हजार रूपये ठेवले होते. चोरट्यांनी ही रोख रक्कम व त्यांच्या पत्नीचे मणी मंगळसुत्र, फुले, झुबे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ४० हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी गोवर्धन डोंगरे यांनी दि.१२ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुस-या घटनेत ताकविकी ता. धाराशिव येथील संतोष विनायक जाधव हे वेळा अमावस्या असल्यामुळे गुरूवारी सकाळी ते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून ताकविकी शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम ३४ हजार रूपये व २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २६ हजार ५०० रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी संतोष जाधव यांनी दि.१२ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.