इंदूर : भाजप नेते मोहन यादव यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लगेचच मोहन यादव यांनी आपल्या सरकारचा पहिला आदेश जारी केला. धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी लावलेल्या बेकायदा लाऊडस्पीकरवर त्यांनी बंदी घातली आहे. तसेच, जे लाऊडस्पीकर कायदेशीर आहेत त्यांना देखील विहित डेसिबल मर्यादेत आणि विहित वेळेतच चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोहन यादव यांच्या या आदेशामुळे अनेक धार्मिक स्थळांवर लावलेले लाऊडस्पीकर काढण्यात येऊ शकतात, असे मानले जात आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी ध्वनिवर्धक किंवा लाऊड स्पीकरवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनंतर गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश राजौरा यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात म्हटले आहे की, “धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी अनियमित किंवा अनियंत्रित लाऊडस्पीकरच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी. या लाऊडस्पीकरच्या वापरासाठी सरकारने पूर्वपरवानगीही बंधनकारक केली असून या लाऊडस्पीकरसाठी ‘डेसिबल’ मर्यादाही निश्चित केली आहे.