नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांना लाइव्ह रिपोर्टिंग टाळण्याचा सल्ला दिला आहे. अशा संवेदनशील माहितीचे प्रसारणामुळे ‘ऑपरेशनल कारवाईसाठी’ धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी कारगिल युद्ध, कंदहार विमान अपहरण आणि २६/११ हल्ल्यावेळी झालेल्या लाइव्ह रिपोर्टिंग(थेट वार्तांकन)मुळे निर्माण झालेले अडथळे लक्षात घेऊन हे आदेश देण्यात आले आहेत.
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी माध्यमांनी सुरुवातीचे दोन दिवसांचे रिपोर्टिंग लाइव्ह केले होते. हेच रिपोर्टिंग बघून दहशतवाद्यांना त्यांचे हॅन्डलर्स फोनवरून पुढील सूचना देत असल्याचे समोर आले होते. सैन्याच्या पुढील कारवाईचा अंदाज यामुळे दहशतवाद्यांना मिळत होता. हाच धोका यावेळी टाळण्यासाठी माध्यमांना लाइव्ह रिपोर्टिंग टाळण्याचा सल्ला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. संवेदनशीलता बाळगण्याचे आणि जबाबदारीने वार्तांकन करण्याचेही आवाहन संरक्षण विभागाने दिले आहे.
जम्मू-कश्मीर मधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादांचे ९ तळ उद्धवस्त केले आहेत. त्यानंतर भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. गुरुवारी दुपारी पाकिस्तानकडून भारताच्या सीमाभागातील १५ गावांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली.
त्यानंतरही भारतीय लष्करी तळावर हवाई हल्ला करणा-याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. यालाही भारताने करारा जवाब दिला आहे. भारत-पाक तणावानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि चीनने मोठे विधान केले आहे. ‘भारत-पाकच्या सुरु असलेल्या युद्धात अमेरिका सहभागी होणार नाही, ते आमचे काम नाही, अमेरिका भारत आणि पाकिस्तानाला नियंत्रित करु शकत नाही. पण दोन्ही देशांना अणुशक्तीचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे असे जे.डी. व्हान्स यांनी म्हटले आहे.