16.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमुख्य बातम्याउदंड झाले बंडोबा

उदंड झाले बंडोबा

महायुती, महाविकास आघाडीसमोर आव्हान

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यातच तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी आणि महायुती यावेळी मैदानात उतरल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक नेत्यांचा हिरमोड झाला. काही ठिकाणी जागावाटप मित्रपक्षाला झाल्याने उमेदवारी मिळाली नाही.

त्यामुळे २८८ पैकी बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. यासोबतच काही ठिकाणी अधिकृत आणि मित्रपक्षाचाही उमेदवार मैदानात उतरल्याने महायुती, आघाडीतही अधिकृत उमेदवारांची अडचण झाली आहे. दरम्यान, १९९५ नंतर प्रथमच यावेळी सर्वाधिक २४५ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उदंड झाले बंडोबा असे म्हणण्याची वेळ आली असून, महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडोबाचे आव्हान असणार आहे.

महायुुती आणि महाविकास आघाडीमुळे दोन्हीकडेही बंडखोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. परंतु उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेईपर्यंत किती नाराजांची समजूत काढण्यात यश येते, यावर सर्व गणित अवलंबून आहे. परंतु जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी झाल्याने बंडखोरांना रोखणे महाविकास आघाडी आणि महायुतीलाही आव्हान असणार आहे.

राज्यात सर्वत्र बंडखोरीचे वारे वाहात असून, मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातही बंडखोरी झाली आहे. आष्टी मतदारसंघात महेबूब शेख विरुद्ध सुरेश धस अशी लढत होत आहे. तिथे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही बंड केले आहे. बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांच्यात लढत होत असताना तिथे जयदत्त क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांनी अर्ज दाखल केला आहे.

परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, धाराशिवमध्येही बंडखोरीचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूरमध्ये दिलीप माने यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच धर्मराज काडादी यांनीही शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच इतर मतदारसंघातही बंडखोरी झालेली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ संपलेला नाही. महाविकास आघाडीने एकूण २८५ उमेदवार दिले आहेत तर ६ जागांवर महाविकास आघाडीतील २ पक्षांचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मिरज मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने तानाजी सातपुते यांना तर काँग्रेसने मोहन वनखंडे यांना उमेदवारी दिली. सांगोला मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख रिंगणात आहेत.

दक्षिण सोलापूर काँग्रेसकदून दिलीप माने व शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली; पण मानेंचा बी फॉर्म वेळ संपेपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. पंढरपूरमध्येही हीच स्थिती आहे. काँग्रेसचे भागीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल सावंत मैदानात उतरले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे रणजित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे आमने-सामने आहेत. यवतमाळच्या दिग्रसमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पवन जैस्वाल आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे मैदानात आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे. महायुतीतही तीन ते चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

बंडखोरीचा मोठा फटका बसणार
मित्र पक्षाच्या उमेदवाराने आपल्याच युती किंवा आघाडीतील उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केल्याने आधीच अडचणी वाढल्या आहेत. त्यातच उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज असल्याने अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे ब-याच मतदारसंघांत बंडखोरी वाढली आहे. या बंडखोरीचा महायुती आणि महाविकास आघाडीलाही फटका बसू शकतो.

४ नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होणार
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलात गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मविआचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले तर, चार मतदारसंघात महायुतीच्या दोन पक्षांचे उमेदवार दोस्तीत कुस्ती करताना दिसणार आहेत. आता ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजीच खरे चित्र स्पष्ट होणार अआहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR