ढाका : बांगलादेशात चिन्मय दास यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला जात आहे. चिन्मय दास यांची तुरुंगातून लवकर सुटका होऊ नये अशी पोलिस प्रशासनापासून ते सरकारपर्यंत सर्वांची इच्छा आहे असा दावा त्यांचे वकील रवींद्र घोष यांनी केला आहे. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोलकाता येथील इस्कॉन मंदिराबाहेर पत्रकारांसबोत बोलताना घोष म्हणाले की, मी बांगलादेशात परत येईन आणि तेथील अत्याचार सहन करणा-या लोकांसाठी लढेन. घोष हे बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दावा केला की त्यांनी चितगाव सत्र न्यायालयात हजर राहून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना तसे करण्याची परवानगी नव्हती. आता या प्रकरणाची सुनावणी २ जानेवारीला होणार आहे. माझी प्रकृती ठीक राहिल्यास मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहीन असे ते म्हणाले. मी हे करू शकत नसल्यास, मी एका चांगल्या वकिलाची व्यवस्था करीन. मी त्यांची लढाई लढत राहीन.
घोष सध्या पश्चिम बंगालच्या बराकपूरमध्ये राहतात. ते उपचारासाठी भारतात आले आहेत. ते म्हणाले की, चिन्मय दास यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. कोलकाता येथे त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि इस्कॉन कोलकाता अध्यक्ष राधारमण दास यांची भेट घेतली. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार हटवल्यापासून अल्पसंख्याक निशाण्यावर आहेत. चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अनेक प्रयत्न करूनही जामीन मिळाला नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध
चिन्मय दास यांच्या अटकेनंतर त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला. बांगलादेशात त्यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनाही अनेकदा मारहाण करण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात डांबण्यासाठीच हे सर्व केले जात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. घोष म्हणाले, मी वकील असून माझा राजकारणाशी संबंध नाही. कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून अल्पसंख्याकांवर ६६५० हल्ले झाले आहेत.