मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे बहुचर्चित नेते माजी खासदार किरीट सोमय्या नुकतेच मालेगावला आले होते. यावेळी त्यांनी मालेगाव शहरात बांगलादेशी व रोहिंग्या राहतात यापासून तर विविध गंभीर आरोप करून वातावरण तापविले. त्यामुळे सध्या मालेगाव चर्चेत आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांबाबत एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी नुकतीच एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यापासून तर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट आव्हान दिले. यावेळी माजी आमदार मौलाना यांनी दिलेल्या माहितीने किरीट सोमय्या यांच्या आरोपातील सर्व हवाच निघून गेली आहे.
आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मालेगावमध्ये ११४ कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले, अशी माहिती विधिमंडळात दिली होती. हा पैसा व्होट जिहादसाठी आला होता, असा दावा त्यांनी केला. याबाबत त्यांनी चौकशी करून माहिती द्यावी अशी मागणी मी पत्र देऊन केली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ११४ कोटी रुपये बँक खात्यात जमा केल्याचा दावा केला होता. ही सर्व खाती मालेगावबाहेरच्या नागरिकांची आणि बिगर मुस्लिम अर्थात हिंदू लोकांच्या नावावर होती. हा सर्व पैसा गुजरातशी संबंधित होता. अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी महापालिकेचे अधिकारी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना जन्म दाखले देत आहेत. मालेगाव शहरात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना वसविले जात आहे. त्यात महापालिकेच्या अधिका-यांनी असे प्रकार झाल्याचे मान्य केले, असा दावाही केला होता.
यावर आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले, मालेगाव महापालिकेतून असे दाखले देण्यात आलेले नाहीत. पोलिसांनी तपास करून पहावा. मालेगाव शहरात एकही बांगलादेशी अथवा रोहिंग्या मुस्लिम नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते देखील आहे. ते केवळ भाषणे का करतात. प्रत्यक्ष कृती करून मालेगावमध्ये एक तरी बांगलादेशी राहत असल्याचे सिद्ध करून कारवाई का करीत नाहीत, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
भाजप आणि किरीट सोमय्या यांचे दुखणे वेगळेच आहे. लोकसभा निवडणुकीत मालेगाव शहरातून भारतीय जनता पक्षाला पाच हजार मते देखील मिळालेली नाहीत. भाजपला केवळ ४५२७ मते आहेत. त्यांच्या विरोधातील निधर्मी पक्षाला १.९८ लाख मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपचा पराभव झाला. या पराभवाने संतप्त झालेल्या भाजपकडून मालेगावला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू करण्यात आले आहे. देशपातळीवर मालेगावला लक्ष्य केले जात आहे. यामुळेच भाजपचे नेते मालेगावविरोधात खोटे आरोप आणि अपप्रचार करीत असल्याची टीका त्यांनी केली.
आमदार मौलाना मुफ्ती यांनी त्यांचे विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार असिफ शेख यांच्यावरही गंभीर आरोप केले. आसिफ शेख यांनी यापूर्वी बांगलादेशी व रोहिंग्यांना मालेगावमध्ये आश्रय देऊ असे विधान २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत केले होते. प्रत्यक्षात त्यांनी केले काहीच नाही. मात्र त्यामुळे भाजपसारख्या पक्षांना मालेगावच्या व शहरातील मुस्लिम लोकांविरोधात आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण करण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व कारस्थान मालेगावकरांनी वेळीच रोखले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.