मुंबई/ नवी दिल्ली : बांगलादेशने भारतीय कांद्यांची आयातबंदी केल्याने त्याचा थेट परिणाम शेतक-यांवर झाला आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव कमी झाल्याने साठवलेला कांदा विक्रीसाठी काढायचा की नाही, या संभ्रमात शेतकरी आहे. साठवलेला कांदा बाहेर काढला नाही, तर पावसाळ्यात कुजतोय आणि बाजार विक्रीला काढला तर कमी भावात विकावा लागतोय. त्यामुळे कांद्याने शेतक-यांचे चांगलेच वांदे केले आहेत.
सध्या बाजारात उन्हाळी कांदा येत आहे. या कांद्याचे पीक एप्रिल-मे महिन्यात येते. शेतकरी हा कांदा साठवतात. तो गरजेनुसार बाजारात आणतात. ऑगस्टअखेरपर्यंत उन्हाळी कांदाच बाजारात मिळतो. सप्टेंबरपासून खरीप हंगामातील लाल कांदा बाजारात येऊ लागतो. मात्र, मधल्या काळात शेतक-यांनी साठवलेल्या कांद्यावरच आपण अवलंबून असतो. शेतक-यांकडील हा कांदाही पावसामुळे हळूहळू खराब होत आहे. त्यामुळे साठवला कांदा तर खराब होतो आणि बाजारात आणावा तर भाव नाही, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडले आहेत.
मोठ्या प्रमाणावर साठा
कांद्याचे भाव कमी झाल्याने अनेक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर त्याचा साठा केला आहे. अनेक दुकानदारांनीही साठा केला असून भविष्यात दर वाढताच त्याची चढ्या दराने विक्री करण्याचा त्यांचा इरादा आहे.
१,४०० रुपये क्विंटल
मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत सध्या कांद्याचे सरासरी भाव क्विंटलमागे १,४०० रुपये आहेत, तर किरकोळ बाजारात कांदा ३० रुपये किलो भावाने घ्यावा लागत आहे. साधारणत: याच काळात मुंबईत कांद्याचे भाव ५० वर पोहोचतात. गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वाढत आहेत. भारतातून विशेषत: महाराष्ट्रातून कांद्याची सर्वाधिक विक्री होते. त्यापैकी ३० टक्के कांदा बांगलादेशला निर्यात होतो. मात्र, बांगलादेशच्या भारतातून कांदा आयात न करण्याच्या निर्णयाला शेतकरी हतबल झाले आहेत.
कांद्याचे प्रति किलो दर (रुपयांत)
महिना २०२४ २०२५
जानेवारी १४ ते २१ १० ते २८
फेब्रुवारी १५ ते २२ १२ ते ३३
मार्च ११ ते २० ९ ते १९
एप्रिल ११ ते १५ ८ ते १५
मे १४ ते २० ७ ते १६
जून १७ ते २५ ११ ते २०
जुलै २४ ते ३० १० ते १७