22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रबारणे की वाघेरे?; उत्सुकता शिगेला

बारणे की वाघेरे?; उत्सुकता शिगेला

पुणे : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. १ जूनला ७ व्या टप्प्यातील मतदान पार पडताच ४ जूनला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता लागली आहे. या मतदारसंघातून बारणे हॅट्ट्रिक करणार की, नवखे संजोग वाघेरे विजयी होणार, याकडे संपूर्ण मतदारांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत फाटाफूट होऊनही या मतदारसंघात दोन शिवसेनेमध्ये चांगली लढत रंगली. त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात आता मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुणे व रायगड जिल्ह्यात विभागलेल्या या मतदारसंघांत दोन शिवसैनिकांत लढत झाली आहे. या मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाले. घटलेल्या मतांचा कोणाला फटका बसणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे.

शिंदे गटाचे श्रीरंग बारणे तिस-यांदा निवडून येण्यासाठी मैदानात होते तर संजोग वाघेरे हे प्रथमच आपले नशीब आजमावत आहेत. वाघेरे हे राष्ट्रवादीचे नेते होते. परंतु लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ते ठाकरे गटात सामिल झाले आणि त्यांनी बारणे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची छुपी साथ मिळाल्याचेही सांगितले जात आहे. कारण काहीही असो. परंतु त्यांनी बारणे यांना मोठे आव्हान दिल्याने सहजासहजी अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे या निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

येत्या ४ जून रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्षात ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फे-या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फे-या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल लावण्यात येणार असून २५ फे-या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ टेबल याप्रमाणे एकूण ११३ टेबलवर मतमोजणी होईल. प्रशासनाने सर्व तयारी केल्याने आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR