बर्लिन : कॅन्सर या जीवघेण्या आजाराचे नाव ऐकले तरी अनेकांच्या तोंडचे पाणी पळते. वैद्यकशास्त्रात खूप मोठी मजल मारल्यानंतरही कर्करोगावर अद्याप खात्रीशीर इलाज सापडलेला नाही. वेळीच सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास कॅन्सरवर उपचार करता येतात. मात्र अखेरच्या टप्प्यात निदान झाल्यास तो एक गंभीर आजार बनतो. कॅन्सर हा संसर्गजन्य आजार मानला जात नाही. मात्र जर्मनीमध्ये घडलेल्या घटनेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जर्मनीमध्ये एका डॉक्टरांना त्यांच्याकडेच उपचार घेत असलेल्या रुग्णाकडून कॅन्सरची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे आतापर्यंत कॅन्सरला संसर्गजन्य आजार मानले जात नव्हते. एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून ट्युमर काढत असताना या डॉक्टरांना कॅन्सरचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार ३२ वर्षांच्या व्यक्तीला एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग झाला होता. शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटामधून ट्युमर काढण्यात येत होता. त्यादरम्यान, एका ५३ वर्षीय डॉक्टरांच्या बोटाला छोटीशी जखम झाली होती. मात्र त्यांनी शस्त्रक्रिया सुरू ठेवली. हीच चूक या डॉक्टरांना महागात पडली. त्यानंतर या डॉक्टरांनी जखमेला डिसइन्फेक्ट करून त्वरित बँडेज बांधले, तसेच ते निश्चिंत झाले. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी या डॉक्टरांना त्यांच्या बोटावर एक गाठ आल्याचे निदर्शनास आले. तसेच ती कर्करोगाची गाठ असल्याचे तपासणीतून समोर आले.
याबाबत अधिक माहिती मिळतावना तज्ज्ञांना सदर शस्त्रक्रिया करत असलेल्या डॉक्टरांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असल्याचे दिसून आले. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी त्यांच्या शरीरात प्रवेश करण्यात यशस्वी ठरल्या. तसेच सदर डॉक्टरांना रुग्णापासून एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग झाला, असेही तपासातून दिसून आले.
मात्र नंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बोटावरील गाठ हटवली. त्यानंतर त्यांना पुन्हा कर्करोग झाला नाही. दुसरीकडे पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काही दिवसानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केलेला तो रुग्ण मात्र मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. या घटनेने कर्करोग हा संसर्गजन्य नसल्याचा आतापर्यंतचा समज खोडून काढला आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढवली आहे.